किल्ले सिंहगड याची सारांशीक माहिती
नाव : सिंहगड
उंची: ४४००फुट.
प्रकार: गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी: मध्यम
ठिकाण: पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव: कोंढणपुर / डोणजे
डोंगररांग: भुलेश्वर
सध्याची अवस्था: जीर्ण
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते.शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि त्यांचे बालमित्र सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत सुभेदार तानाजी मालुसुरे यांना वीरमरण आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवले. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मुघलांच्या ताब्यात होता.
गडावरील पहाण्याची ठिकाणेकल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळची घरे उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला : लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी १८९० साली सिंहगडावर थोडी जमीन खरेदी करून स्वत:साठी एक बंगला बांधून घेतला होता. ह्याच बंगल्यामध्ये त्यांनी ‘ओरायन’ व ‘आर्क्टिक होम्स इन वेदाज’ ही आपली दोन सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली होती. १९१५ मध्ये ह्याच ठिकाणी त्यांची व गांधींची पहिली भेट झाली होती.
कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
झुंजारबुरूज: झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच सुभेदार तानाजी मालुसुरे आपल्या मावळ्यांसह वर चढले होते .
राजाराम महाराज स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये किल्ले सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.
सुभेदार तानाजींचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. ‘सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
रेल्वेने :
जवळचे रेल्वे स्थानक – पुणे रेल्वे स्टेशन आहे. तिथून पुढे तुम्हाला स्वारगेट बस स्थानक ची बस आरामात मिळून जाईल. बस प्रवास खर्च २० रुपये येऊ शकतो.
रस्त्याने :
पुणे शहरापासून २० कि.मी.अंतरावर आहे.पुणे येथील मुख्य बस स्थानक स्वारगेट येथून किल्ले सिंहगड पायथा ची सरळ पी एम पी एम एल (PMPML) बस सेवा उपलभ्द्ध आहे.बस प्रवास खर्च साधारण ३० रुपये येऊ शकतो. परंतु ही बस सेवा तुम्हाला गडाच्या पायथ्याला (दोणजे गाव) सोडते. तिथून तुम्ही किल्ले सिंहगड गडावर पायी चढू शकता. गड चढायला साधारण २-४ तास लागतात.
मुख्य बस स्थानक स्वारगेट येथून तुम्ही बस घेऊन किल्ले सिंहगड गडाच्या पायथ्याशी उतरु शकता. जर तुम्हाला गड चढण्यास अडचण होत असेल तर तुम्ही शेरिंग चार चाकी गाडी ने ८०-१०० रुपये प्रती प्रवासी देऊन गाडीने डायरेक्ट गडावर पोहचू शकता.
सिंहगड किल्ला वर्षातील सर्व ३६५ दिवस भेटीसाठी खुला असतो. तुम्ही सकाळी ५ पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कधीही जाऊ शकता. गडावर खाण्याची उत्तम सोय उपलभ्द्ध आहे.