Rajgad | राजगड अर्थातच राजांचा गड किंवा राज्य करणारा गड. राजगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असून पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला ६५ किलोमीटर अंतरावर आहे. राजगड हा किल्ला निरा व गुंजवणी नदीच्या खोऱ्यात मुरुंबदेवाच्या डोंगरावर आहे.
राजगड(Rajgad) या किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. हा किल्ला फार पूर्वीपासून अस्तित्वात होता परंतु त्याला गडाचे भव्य दिव्य असे स्वरूप नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर तेथे मिळालेल्या गुप्तधनाचा उपयोग करून या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम केले. या किल्ल्याला पद्मावती, सुवेळा, संजीवनी अशा तीन माच्या होत्या. या तीनही माच्यांना महाराजांनी तटबंदी बांधली. मुख्य किल्ल्याचे बांधकाम करून त्यास राजगड असे नाव दिले. महाराजांनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक क्षण या किल्ल्यावर घालवलेले आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून राजगड(Rajgad) हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. तब्बल २६ वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता त्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी हलवण्यात आली.
या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटना अनुभवल्या आहेत त्यापैकी काही पुढील प्रमाणे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म, महाराणी सईबाई यांचा मृत्यू, आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज याच किल्ल्यावर परत आले होते, अफजलखानाचा वध केल्यानंतर त्याचे शीर याच किल्ल्याच्या महादरवाज्यात दफन करण्यात आले आहे, सोनोपंत डबीर यांची छत्रपतींना दिलेली शिकवण अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार राजगड(Rajgad) किल्ला आहे.
मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी आपल्या ताब्यातील २३ किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले होते. व बारा किल्ले स्वतःच्या ताब्यात ठेवले होते या १२ किल्ल्यांमध्ये राजगड(Rajgad) या किल्ल्याचा सुद्धा समावेश होतो.
११ मार्च १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर मोघलांनी स्वराज्यातील अनेक किल्ले जिंकून घेण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नात जून १६८९ मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकून घेतला परंतु छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी अजूनही स्वराज्यात पसरली नव्हती त्यामुळे मराठी मोठ्या प्रमाणात गोळा झाले व त्यांनी आपल्या स्वबळावर राजगड(Rajgad) पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पुढे १७०३ मध्ये औरंगजेब स्वतः राजगडावर चाल करून आला व अथक परिश्रमानंतर ४ फेब्रुवारी १७०३ हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला. पुढे मे १७०७ मध्ये गुणाजी सावंत या सरदाराने पुन्हा एकदा राजगडावर स्वारी करून हा किल्ला स्वराज्यात सादर केला तेव्हापासून १८१८ पर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता.
Rajgad किल्ल्यावरील पाहण्याची ठिकाणे
१) पद्मावती मंदिर
या मंदिराचा जिर्णोद्धार २००२ साली करण्यात आला आहे. महाराजांनी किल्ल्याचे बांधकाम केल्यानंतर या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर बांधले सध्या या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती बघायला मिळतात. या मंदिरात असलेली मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे तर उजव्या बाजूला असलेली लहान मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. मंदिराच्या समोरच महाराणी सईबाई यांची समाधी आहे.
२) पद्मावती तलाव
पद्मावती मंदिराच्या डाव्या बाजूला तसेच गुप्त दरवाजातून पद्मावती माची वर आल्यावर आपल्याला विस्तीर्ण असा एक तलाव दिसतो या तलावाचे बांधकाम अजूनही शाबूत आहे. तलावात जाण्यासाठी एक कमान करण्यात आलेले आहे.
३) रामेश्वर मंदिर
पद्मावती देवीच्या मंदिरासमोर पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती असे मानले जाते मंदिरात असणारे मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
४) राजवाडा
रामेश्वर मंदिरापासून उजवीकडे पायऱ्यांनी वर गेले असता आपल्याला राजवाड्याचे काही अवशेष आढळतात या राजवाड्यामध्ये एक तलाव सुद्धा असून राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आमदार खायला लागतो त्याचा थोडेच पुढे सदर आहे व सदरेच्या समोर दारू कोठार आहे.
५) बालेकिल्ला
राजगडावरील सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अरुंद व कठीण आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश करताना आपण प्रथम महादरवाजात पोचतो. महादरवाजाची उंची सहा मीटर उंच असून हा दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. दरवाजावर कमळ स्वस्तिक अशी शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्यावर आपल्याला जननी मंदिर, चंद्रतळे बघायला मिळते. बालेकिल्ल्यावरून आपल्याला राजगडाचा घेरा लक्ष देतो बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती व वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात.
६) सुवेळा माची
पद्मावती मंदिरापासून पुढे आले की एक तीडा असून तेथील तिथली वाट बालेकिल्ल्याकडे एक सूवेळा माची कडे तर एक संजीवनी माचीकडे जाते. सुवेळा माचीवर सूर्योदय बघणे ही दुर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच असते.सुवेळा माचीला १७ बुरूज आहेत त्यापैकी सात बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
७) संजीवनी माची
या माचीची एकूण लांबी अडीच किलोमीटर असून ही माची सुद्धा तीन टप्प्यात बांधलेली आहे. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. या माचीवर अनेक पाण्याचे टाके आहेत तसेच या ठिकाणी जाण्यासाठी आळू दरवाजाने सुद्धा जाता येते.
राजगड(Rajgad) हा किल्ला पाहण्यासाठी साधारण आपणास दोन दिवस लागतात या गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे किल्ले सुद्धा अगदी सहजपणे दिसून येतात.
राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग
१) पाली दरवाजा मार्गे
राजगड(Rajgad) किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत सोप्पा मार्ग म्हणजे पाली दरवाजा मार्गे जाणे होय. ही वाट पायऱ्यांची असून अत्यंत सोपी आहे या मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी तीन तास लागतात.
जर तुमच्या सोबत लहान मुले किंवा वयोवृद्ध लोक असतील तर या मार्गाची निवड करा.
२) चोर दरवाजा मार्ग
हा मार्ग जरासा खडतर असून या मार्गाने गेल्यास आपण पद्मावती तलावाजवळील चोर दरवाजा मार्गे किल्ल्यात प्रवेश करतो. या मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागू शकतात.
३) गुंजवणे दरवाजा मार्ग
किल्ल्यावर जाण्यासाठी ही वाट अवघड असून या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी अडीच तास लागतात. जर तुमच्या सोबत कोणी माहितगार असेल तरच या मार्गाचा उपयोग करावा
किल्ल्यावर राहण्याची सोय
किल्ल्यावर असलेल्या पद्मावती मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते तसेच पद्मावती माची वर पर्यटकांना राहण्यासाठी निवासाच्या खोल्या आहेत.
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय
किल्ल्यावर जरी बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके असले तरी तुम्ही स्वतःचे पिण्याचे पाणी घेऊन जावे. जेवणासाठी पायथ्याशी असलेले गावकरी पद्मावती मंदिरा पोहे झुणका भाकरी भाजी याची व्यवस्था करतात परंतु तुम्ही तुमच्यासोबत अन्नपदार्थ घेऊन जाऊ शकता.
राजगड(Rajgad) हा किल्ला कॅम्पिंग साठी एक आदर्श किल्ला समजला जातो. किल्ल्यावर बघण्यासाठी खूप गोष्टी असून हा किल्ला काही एका दिवसात बघण्यासारखा नाही त्यासाठी तुम्ही आवर्जून दोन दिवसाचा वेळ काढावा. किल्ल्यावर दोन मंदिरे असून या ठिकाणी तुम्ही रात्रीचे थांबू शकता परंतु तुमच्याकडे स्वतःचे तंबू असतील तर अति उत्तम कारण किल्ल्यावर भरपूर छान ठिकाने आहेत ज्या ठिकाणी तुम्ही रात्री तंबू लावू शकता
किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
तसे तुम्ही किल्ल्याला वर्षभरात कधीही भेट देऊ शकता परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेला राजगड बघायचा असल्यास पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी. परंतु पावसाळ्यात किल्ल्यावर जाण्याचा मार्ग निसरडा होतो त्यामुळे किल्ल्यावर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
One Comment