Lohgad | लोहगड हा महाराष्ट्रात असलेल्या अनेक दुर्गांपैकी एक दुर्ग आहे. महाराष्ट्रातील लोणावळा या शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर हा किल्ला आहे व पुणे पासून अंदाजे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. लोहगड किल्ल्याची उंची ३३८९ फूट तर १०३३ मीटर एवढी आहे. हा किल्ला जवळच असलेल्या विसापूर किल्ल्यासोबत एका छोट्या डोंगरा रांगेने जोडला आहे.
हा किल्ला अत्यंत मजबूत बुलंद असून या किल्ल्याची निर्मिती सुमारे सत्ताविशसे वर्ष जुनी असावी असे म्हटले जाते, कारण या किल्ल्याच्या जवळच भाजे व बेडसे या बौद्धकालीन लेण्या सुद्धा आहेत व या लेण्यांच्या निर्मिती काळातच या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. बऱ्याच राजवटी या किल्ल्याने पाहिल्या असून यामध्ये सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, निजामशाही, आदिलशाही, मराठे, मोगल व इंग्रज या सर्वांचे या किल्ल्यावर काही ना काही वर्ष राज्य होते.
इसवी सन १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला त्यासोबतच लोहगड(Lohgad) विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील केला. परंतु १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग सोबत झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला महाराजांनी मोगलांचा स्वाधीन केला. पुढे औरंगजेबाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर १६७० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील केला. सुरत लुटल्यानंतर तेथून आणलेली लूट नेताजी पालकरानी याच लोहगड(Lohgad) किल्ल्यावर ठेवली होती. १८०३ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला होता परंतु दुसरा बाजीराव यांनी तो पूर्ण जिंकून घेतला. इसवी सन १८१८ ला इंग्रजांनी आधी विसापूर किल्ला जिंकला हा किल्ला जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी लोहगड(Lohgad) इंग्रजांच्या ताब्यात दिला.
आणखी वाचा: जंजिरा किल्ल्याविषयी अधिक माहिती
लोहगड(Lohgad) किल्ल्याला चार मोठे दरवाजे आहेत जे आजही चांगल्या स्थितीत आपणास बघायला मिळतात या चार दरवाजांची नावे पुढीलप्रमाणे
१) गणेश दरवाजा
२) नारायण दरवाजा
३) हनुमान दरवाजा
४) महादरवाजा
महादरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला एक दर्गा दिसतो या दर्ग्याच्या शेजारीच आपल्याला सदर व लोहार खानाचे अवशेष आढळतात त्याच्या बाजूलाच बांधकामाचा चुना बनवण्याचा जुना घाना आहे. याच्या जवळच आपल्याला एक तोफ दिसून येते. उजवीकडे चालत गेल्यास आपल्याला लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. दर्ग्याचा थोडे पुढे उजवीकडे गेल्यास पुढे एक सुंदर शिव मंदिर आहे त्याच्यापुढे एक सुंदर तळे आहे. त्याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाके सुद्धा आहे. लक्ष्मी कोठीच्या पुढे पश्चिमेस विंचू कडा आहे त्याच्या आकारामुळे याला विंचू कडा असे म्हटले जाते. हा कडा बघून आपणास राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण येते.
किल्ल्यावर राहण्याची सोय
लोहगड(Lohgad) किल्ल्यावर कॅम्पिंग करण्याची परवानगी आहे की नाही याची खात्री नाही परंतु जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात कॅम्पिंग करायचे असेल तर जवळच असलेल्या पवना तलवाच्या परिसरात तुम्ही कॅम्पिंग करू शकता.
आणखी वाचा: कार्ले लेणी
किल्ल्यावर खाण्याची सोय
लोहगड(Lohgad) किल्ल्यावर जाताना आपण सोबत खाण्याचे पदार्थ न्यावेत. परंतु शक्य न झाल्यास किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोटे स्टॉल व रेस्टॉरंट आहेत जेथे याची सुविधा होऊ शकते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे एक टाके असून त्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता परंतु सोबत पाणी घेऊन जावे.
किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हणजे पावसाळा व पावसाळ्यात या डोंगरा वरती विविध प्रकारचे पक्षी आणि कीटक देखील तुम्हाला दिसतात. पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटलेला असतो.
किल्ल्यावर कसे पोहोचाल
पुणे किंवा मुंबईवरून जाताना तुम्हाला जुन्या पुणे मुंबई जायचे आहे. पुण्यावरून जाताना लोणावळ्याच्या अलीकडेच तुम्हाला कार्ला लेणीकडे जाणारा मार्ग दिसेल. तेथून तुम्हाला उजवीकडे वळण घ्यायचे आहे. व मळवली या गावाच्या दिशेने जायचे आहे. व तेथून लोहगड कडे जाणारी वाट पकडावी.
लोहगड हा किल्ला पुणे पासून ६९ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबईपासून ९९ किलोमीटर आहे.
जर तुम्ही ट्रेन ने जायचा विचार करत असाल तर तुम्हाला मळवली या स्टेशनवर उतरावे लागेल यासाठी तुम्हाला पुणे किंवा लोणावळा येथून लोकल मिळू शकते. मळवली पासून तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचू शकता.
या किल्ल्याचा ट्रेक खूप सोप्पा असून एखादा नवशिक्या सुद्धा हा ट्रेक पूर्ण करू शकतो. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला २००-३०० पायऱ्या चढाव्या लागतात. ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १ ते १.५ तास लागू शकतो.
जर तुम्ही पावसाळ्यात या किल्ल्याला भेट देणार असाल तर काळजी घ्याल कारण पावसामुळे या पायऱ्यावरती पाणी साचून या पायऱ्या निसरड्या होतात त्यामुळे घसरून पडण्याची शक्यता आहे. भाजे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे २ तास लागतात तर लोहगडवाडी येथून ३० मिनिटे लागतात.