हरिश्चंद्रगड
नाव: हरिश्चंद्रगड
उंची: ४००० फूट / १४२४ मीटर
प्रकार: गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी: मध्यम
ठिकाण: अहमदनगर जिल्हा,महाराष्ट्र.
जवळचे गाव: पाचनई,खिरेश्वर
डोंगररांग: हरिश्चंद्राची रांग
सध्याची अवस्था: व्यवस्थित
ठाणे, पुणे आणि अहमदनगर या ३ जिल्ह्यांच्या सीमेवर हा किल्ला असून माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक असून महाराष्ट्र मधील ८वे सर्वात उंच शिखर आहे.हरिश्चंद्रगड हा इतिहास, साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचा पुरावा म्हणून उभा आहे. विस्मय निर्माण करणारा हा किल्ला नैसर्गिक चमत्कार आणि स्थापत्यशास्त्रातील चमत्कारांचा खजिना असून या किल्ल्याचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे.
हरिश्चंद्र किल्ल्याला त्याचे नाव राजा हरिश्चंद्र यांच्यानावावरून मिळाले आहे असे मानले जाते.जो सत्य आणि न्यायासाठी व तसेच त्यांच्या अटल वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की राजाच्या चारित्र्याची चाचणी याच टेकड्यांवर झाली होती. तसेच जवळ असलेल्या शिखरांची नावे तारामती आणि रोहिदास अशी नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.
३ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांपासून वेगळा आहे कारण या किल्ल्याला तटबंदी नाहीये. या किल्ल्यावर प्राचीन लेणी असून, जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर येथे आहे.
अंदाजे दहाव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांपेकी हे एक मंदिर आहे.पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही वेगळेच असते. गडावर आढळणारी वनस्पतींची विविधता इतरत्र कुठेही आढळून येत नाही.अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ आहे.
गडावर राहण्याची, पाण्याची व खाण्याची सोय उपलभ्द्ध आहे.
किल्ल्यावरील पाहाव्याची ठिकाणे:
१) हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर:
१०व्या शतकातील शिलाहार राजा झांज याने गोदावरी ते भीमा या नद्याच्या दरम्यान असलेल्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवमंदिरे बांधली होती. त्यांतील एक म्हणजे हे शिवमंदिर आहे.मंदिराच्या समोर नंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात अनेक गुहा असून, काही गुहा राहण्यासाठी योग्य असून काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व पिण्यायोग्य आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक विहीर (पुष्करणी) आहे. विहिरीला असलेल्या कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली घळ असून, या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. पिंडीच्या सभोवती प्रदक्षिणा मारता येते. दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
२) कोकणकडा:
कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे आकर्षण आहे. ३००० फूट उंच असणारा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे.हा कडा इंग्रजी लिपीतील ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. हा कडा जसा त्याच्या अक्राळ विक्राळ सुळ्यांसाठी प्रसिद्ध आहे तसाच तो इथून दिसणाऱ्या सूर्यास्तासाठी सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. या कोकणकड्याची प्रसिद्धी लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी हरिश्चंद्रगडावर कोकणकडा महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात येऊ लागले आहे.
३) तारामती शिखर:
तारामती शिखर हे महाराष्ट्र राज्यातील सहावे सर्वोच्च शिखर असून समुद्र सपाटीपासून ४६९५ फूट / १४३१ मीटर आहे.हरिश्चंद्रगड पठारावर वसलेले, हे ठिकाण त्याच्या निखळ सौंदर्यामुळे शौकींनाना ट्रेकिंगचा उत्तम अनुभव देते. तारामती शिखरावर एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची साडेआठ फुटाची भव्य अशी सुंदर मूर्ती आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी ४ मार्ग उपलभ्द्ध आहेत.
१) खिरेश्वर गावातून
२) नगर जिल्ह्यातून (पाचनई मार्गे)
३) सावर्णे – बेलपाडा – साधले या घाटमार्ग
४) नळीची वाट
भेट देण्यासाठी योग्य वेळ:
हरिश्चंद्र किल्ल्यावरील अविस्मरणीय सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यांत, ऑक्टोबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान आनंददायी असते आणि आकाश स्वच्छ असते.
कसे पोहोचाल?:
हवाई मार्गाने
सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी (मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
हरिश्चंद्रगड पासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहमदनगर बस स्थानकापासून हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस नियमित उपलब्ध आहेत.