घटस्थापना विधी
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात आश्विन प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र बसते. त्यामध्ये ‘घटस्थापना’ हा महत्त्वाचा विधी होय; प्राचीन वैदिक काळापासून ‘पूर्णकलश’ (भरलेला) हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
पश्चिम बंगाल एवढी मोठ्या प्रमाणात दुर्गा पूजा महाराष्ट्रात नसली तरी महाराष्ट्र, गुजरात आणि सौराष्ट्रात घटस्थापनेला महत्त्व आहे. याचा विधी निर्णयसिंधू या संस्कृत ग्रंथात सांगितला आहे. प्रतिपदेच्या दिवशी प्रातःकाळी हा विधी करावयाचा असतो.
देवघराजवळ पवित्र अशा स्थानावरून माती आणून तिचा ओटा तयार करून त्यामध्ये जव-गहू तसेच विविध प्रकारच्या धान्याचे दाणे पेरतात. सुवर्ण-चांदी अथवा मातीचा घट स्थापन करतात. त्यामध्ये पाणी भरून त्यावर चंदनाचे गंध, दूर्वा, सर्वौषधी आणि आंबा आदी पाच वृक्षांची पाने खोवतात. त्याभोवती वस्त्र गुंडाळून त्यावर तांदळांनी भरलेले पात्र ठेवतात. त्या पात्रावर वरुण देवतेची पूजा करतात. दुर्गेचे ध्यान करून प्रतिमेची स्थापना करून आवाहन करण्यात येते.
मराठी माणसे रोज एक फुलांची माळ त्यावर चढवून नवरात्र साजरे करतात. या काळ्या मातीत उगवलेले धान्य दसऱ्याच्या दिवशी मस्तकावर धारण करून सीमोल्लंघनाला जातात.
बंगालमध्ये सर्वतोभद्र मंडल काढून त्यावर नऊ घट बसवतात. ते गुलालाने भरलेले असतात. त्याच्यावर रंगीबेरंगी निशाणे लावतात. दुर्गापूजेचा खरा उत्सव षष्ठीला सुरू करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये बेलाच्या झाडाजवळ घटस्थापना करतात. त्या वृक्षाचीच दुर्गा म्हणून पूजा करतात; सौभाग्य वाणे, आरसा-निरांजनादी देवीला देतात, नंतर दुर्गेचे आवाहन करतात.
केळ, डाळिंब, कोथिंबीर, हळद, बेल, अशोक इत्यादी नऊ वृक्षांच्या छोट्या फांद्या अथवा पाने अपराजिता वेलीने एकत्र बांधून जुडगा करतात. त्या जुडग्याची व दुर्गेची एकत्र पूजा करावी. देवीला बेलाच्या झाडाखाली वास्तव्य करण्याची प्रार्थना करावी, असे तिथीतत्त्वात सांगितले आहे षष्ठीप्रमाणे, सप्तमी – अष्टमी-नवमी या दिवसांचे वेगवेगळे विधी सांगितले आहेत. अष्टमीच्या दिवशी आठ कुमारिकांचा शक्य नसल्यास प्रतिदिवशी एक कुमारिकेचा याप्रमाणे सत्कार करीत जावे.
घटस्थापणेसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे महत्व :
पान –
विड्याच्या पानात छोट्या देठात श्री विष्णूचा, पानाच्या मध्यभागी श्री सरस्वतीचा तर पानाच्या टोकाला लक्ष्मीचा वास असतो. देवी देवतांचा वास असल्याने शुभ शकुन म्हणून विड्याचे पान आणि चांगल्या कार्याचा श्री गणेशा म्हणून सुपारीच्या रूपात गणपती म्हणून विड्याच्या पानाला मान आहे. पानामध्ये ‘सी’ व्हिटॅमिन तत्त्व असल्यामुळे विड्यापासून घटात ठेवण्यापर्यंत पानाचे महत्त्व आहे.
नारळ-
नारळ हे फक्त फळ नाही. धार्मिक दृष्टिकोनातून त्यालादेखील जिवंत अस्तित्व आहे, असे मानले जाते. नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजेच देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले जाते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो. निरोगी हृदयासाठी वैद्यकीय शास्त्रात नारळाचे महत्त्व आहे. नारळामध्ये ‘ब्रेन बुस्टिंग’ गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेल्सला सक्रिय करतात.आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.
आंब्याची पाने-
ज्योतिषशास्त्रात आंब्याचे झाड मंगलाचा कारक असे वर्णन केले आहे. त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. घरात प्रवेश करताच घरात सकारात्मक ऊर्जा आणते. कॅन्सर आणि पचनाशी संबंधित आजारांवरही आंब्याचे पान फायदेशीर आहेत. आंब्याच्या रसाने अनेक आजार बरे होतात.
पूजत धान्य-
घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते. याला सप्तधान्य असेही म्हटले जाते. या धान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी,
चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रातील पूजेत विड्याच्या पानालाही महत्त्व असते. कलशात ठेवण्याची विड्याच्या पानांचा वापर केला जातो. तेव्हाच कलशाची म्हणजेच घटस्थापना पूर्णत्वास जाते, असे म्हटले जाते.
अखंड ज्योत-
शास्त्रांनुसार, नवरात्रीच्या पूजनात अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की, नवरात्राची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते. एखाद्या व्यक्तींने संकल्प करून संपूर्ण नवरात्र अखंड दीप प्रज्वलित ठेवला, तर देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या आशीर्वादामुळे जीवन सदैव प्रकाशमान राहते.
महत्त्व वेदपारायणाचे –
नवरात्रात नऊदिवस व्रत कत्यनेि वेदपारायण ऐकावे. दररोज चंडीपाठ (देवीमाहात्म्य) चढत्या क्रमाने (प्रतिपदेला एक वेळा, द्वितीयेला दोन वेळा या पद्धतीने) करावा. या पाठाचे शतचंडी-सहस्त्रचंडी असेही प्रकार आहेत, त्यानुसार हवनही करता येते. काही ठिकाणी देवीला बली द्यायची प्रथा आहे. आता हा बली प्रत्यक्ष पशू-पक्ष्यांचा नसून, पिष्टमय करून देतात. क्वचित कोहळा हे फळ बळीसाठी वापरतात. दुर्गापूजेतील महत्त्वाचा विषय देवीची प्रतिमा कशी असावी. देवीच्या प्रतिमेत देवीसह सिंह-महिषासुर एवढेच असावे.
सध्याच्या काळात देवीच्या शेजारी लक्ष्मी-गणेश- सरस्वती-कार्तिक स्वामी यांच्या प्रतिमा असतात. देवीची प्रतिमा मुख्यत्वे सुवर्ण-रूपे-चांदी या धातूंची अथवा पाषाण-मृत्तिका यांची केली तरी चालते. पूजेला प्रतिमाच लागते, असे नाही. देवीची पूजा, स्थंडिलावर, लाकडी अथवा दगडांच्या पादुकांवर, चित्रावर, अथवा देवीच्या आयुधावर (त्रिशूल वगैरे) अथवा उदक पात्रावर करावी. पूजा प्रातःकाळीच शुचिर्भूत होऊन करावी. काही धर्मग्रंथातून पूजा त्रिकाळ म्हणजे प्रातःकाळ, माध्यान्ह आणि सायंकाळी करावी असे सांगितले आहे. विशिष्ट इच्छित फलासाठी म्हणजेच विशिष्ट नवसासाठी विशिष्ट नक्षत्रावर तिथीवर वेळेवरच पूजा बांधावी, असे काही ग्रंथकार सांगतात.
दुर्गापूजेचा उत्सव निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील उल्लेखावरून आणि जुन्या नाण्यावरील मिळालेल्या मुद्रावरून हा उत्सव इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून पाळण्यात येतो, अशी माहिती मिळते. आसाम-बंगालमध्ये सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव अभूतपूर्व असा लोकप्रिय महोत्सव मानला गेला आहे. देवीची पूजा म्हणजे स्त्रीशक्तीची पूजा मानायला हवी, निसर्गाने तिला कोमलता दिली, तरी प्रसंगी ती चण्डिकेचे रूप धारण करू शकते आणि म्हणून त्या शक्तीची पूजा म्हणजे नवरात्र उत्सव, ती शक्ती प्रत्येक स्त्रीला मिळावी आणि कलियुगातील नराधम नष्ट करण्याचे बळ त्या देवीमातेने आपल्याला द्यावे अशी प्रार्थना करूयात.