Site icon dnyankosh.in

Bhandardara | भंडारदरा एक निसरगरम्य पर्यटन स्थळ

Bhandardara | भंडारदरा हे  महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एक गाव असून या ठिकाणी अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत. भंडारदरा हे अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले एक पर्यटन स्थळ असून दरवर्षी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. दरवर्षी पावसाळा मध्ये हे ठिकाण निसर्गाच्या हिरवाईने व धबधब्यांनी नटून जाते. चला तर मग बघूया या ठिकाणी भेट देण्यासारखी पर्यटन स्थळे

रंधा धबधबा 

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी रंधा धबधबा हा एक आहे. भंडारदरा (Bhandardara) कॉलनी बस स्थानकापासून हा धबधबा ८.५ किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा प्रवरा नदीवर असून नदीचे पाणी जेव्हा १७० फूट खोलदरीत खाली कोसळते त्यामुळे तयार झालेला हा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात. पावसाळ्यात जेव्हा नदी मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन जात असते तेव्हा हे पाणी डोंगरांच्या खडकाळ कडावरून खाली बसताना मोठ्या प्रमाणात आवाज करते. त्यामुळे येथील दृश्य पाहून मन थक्क होऊन जाते.

पावसाळ्यात हा धबधबा मोठे रौद्र रूप धारण करतो. त्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती सुद्धा निर्माण होते. रंधा धबधब्याला लागूनच असलेला कातळापूरचा धबधबा हे सुद्धा एक पर्यटकांच्या आवडते स्थळ आहे. या धबधब्यावर अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा झाले आहे.

धबधब्याचे ठिकाण: हा धबधबा राजुर भंडारदरा रोडवर असून, भंडारदरा कॉलनी बस स्थानकापासून ८.५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून हा धबधबा १६५ किलोमीटर अंतरावर तर पुणे शहरापासून १६० किलोमीटर अंतरावर आहे.

भेट देण्यासाठी योग्य वेळ: वर्षभरात तुम्ही कोणत्याही वेळी या ठिकाणी भेट देऊ शकता परंतु तुम्हाला या धबधब्याचे विहंगम दृश्य बघायचे असल्यास पावसाळ्यात या ठिकाणाला भेट द्या.

प्रवेश शुल्क: प्रति व्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.

वसुंधरा धबधबा 

वसुंधरा धबधबा हा धबधबा भंडारदरा (Bhandardara) भागातील सर्वात सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा धबधबा आहे. हा धबधबा भंडारदरा येथील कोलटेंबे भागात आहे. जर तुम्ही भंडारदरा येथे पावसाळी सहलीचे आयोजन करत असाल तर घनदाट जंगलात लपलेला हा धबधबा पाहायला विसरू नका. मुख्य रस्त्यापासून हा धबधबा फक्त दहा मिनिटं अंतरावर आहे. या ठिकाणी फार कमी प्रमाणात गर्दी असते. तर बाहुबली धबधब्याला तुमच्या भंडारदरा भेटीत भेट आवर्जून भेट द्या.

धबधब्याचे ठिकाण: भंडारदरा कॉलनी स्थानकापासून हा धबधबा केवळ २ किलोमीटर अंतरावर आहे.

भंडारदरा धरण बॅक वॉटर

भंडारदरा (Bhandardara) हे धरण प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण असून याला विल्सन डॅम असे सुद्धा म्हणतात तर याच्या जलाशयास ऑर्थर लेक असे म्हटले जाते. हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून येथे डोंगरांमध्ये अनेक धबधबे बघायला मिळतात. येथील डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध व थंड हवा इथल्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा हे अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटन स्थळ असून दरवर्षी या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

हे ठिकाण मुंबई पासून १६० किलोमीटर तर पुणे शहरापासून १७० किलोमीटर अंतरावर आहे.

या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा पावसाळ्याचा जुलै ते ऑक्टोंबर हा आहे.

आणखी वाचा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले 

संधन व्हॅली

संधन व्हॅली म्हणजे जमिनीला पडलेली मोठी एक भेग व त्यामुळे तयार झालेली दरी किंवा घळ आहे. हा एक निसर्गाचा चमत्कारच असून संधण दरी २०० ते ४०० फूट खोल असून याची लांबी ४ किलोमीटर आहे. पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देणे जोखमीचे ठरू शकते कारण कारण पावसाचे पाणी याच दरीमधून वाहत असते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधीमध्ये उन्हाळ्याचा काळ होय. येथे होणारा ऊन सावलीचा खेळ बघण्यासारखा असतो. तुम्ही या ठिकाणाला हिवाळ्यात सुद्धा भेट देऊ शकता परंतु यामध्ये उतरण्या अगोदर पाण्याची पातळीचा अंदाज घ्या.

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला भंडारदरा (Bhandardara) धरणाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. या दरीच्या मुखाजवळच पाण्याचा पाणवठा आहे. ही दरी काही ठिकाणी आठ दहा फूट रुंद तर काही ठिकाणी केवळ एक माणूस जाईल एवढीच रुंद आहे. ही तरी पार केल्यानंतर दुसरा टोकाला आपल्याला कोकणकड्याचे विहंगम असे दृश्य दिसते. जर तुम्ही या ठिकाणाला भेट देणार असाल तर जेवणाची व राहण्याची सोय साम्रद या गावात होऊ शकते.

अम्ब्रेला धबधबा

हा धबधबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी असलेल्या भंडारदरा (Bhandardara) येथे आहे. हा धबधबा नैसर्गिक धबधबा नसून धरणातून बाहेर पडणारे जास्तीचे पाणी जेव्हा या दगडावर पडते त्यामुळे त्याला छत्रीसारखा आकार निर्माण होतो त्यामुळे या धबधब्याला अम्ब्रेला धबधबा असे म्हणतात. हा धबधबा मुंबईपासून १६१ किलोमीटर तर पुणे पासून १६८ किलोमीटर अंतरावर आहे.

भेट देण्यासाठी योग्य वेळ: या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य वेळ ही पावसाळ्यात असून येथील स्थानिक अधिकारी पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात याबाबत माहिती देतात या माहितीचा आधारावर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

नेकलेस धबधबा

कोलटेंबेच्या शांत परिसरात असलेला हा धबधबा त्याच्या आकारमुळे त्याला नेकलेस धबधबा म्हणतात. हा धबधबा हिरवळीने नटलेला निसर्गरम्य परिसरात असून येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला एक छोटासा ट्रेक करावा लागतो. हा धबधबा भंडारदरा (Bhandardara) व रतनवाडी रस्त्यावर असून भंडारदरापासून १३ किलोमीटर तर रतनवाडी पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.

आणखी वाचा: महाराष्ट्रातील १५  प्रसिद्ध धबधबे 

रिव्हर्स धबधबा

हा धबधबा सुद्धा भंडारदरा (Bhandardara) धरणाजवळ असून भंडारदरा कॉलनी बस स्थानकापासून केवळ ४ किलोमीटर अंतरावर आहे.

न्हानी धबधबा 

हा धबधबा रतनवाडी भंडारदरा(Bhandardara) रोडवर असून रस्त्याच्या कडेलाच असलेला हा एक खूप छान धबधबा असेल फार मोठ्या प्रमाणात पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्यांची सुद्धा व्यवस्था आहे. हा धबधबा रतनवाडी पासून ३.५ किलोमीटर अंतरावर आहे.

 

Exit mobile version