अष्टविनायक गणपती

अष्टविनायक गणपती

अष्टविनायक गणपती ची नावे आणि माहिती

  • श्री. मोरेश्वर – मोरगाव
  • श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक
  • श्री. बल्लाळेश्वर – पाली
  • श्री. वरदविनायक – महड
  • श्री. चिंतामणी – थेऊर
  • श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री
  • श्री. विघ्नेश्वर – ओझर
  • श्री. महागणपती – रांजणगाव

चला तर मग सुरवात करूया अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती  खालील प्रमाणे :

१)श्री. मोरेश्वर – मोरगाव

मोरेश्वर – मोरगाव

अष्टविनायक गणपती मधील हे सर्वात पहिले ठिकाण बारामती तालुक्यात कऱ्हा  नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायऱ्या  असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायऱ्या चढून गेल्यावर एका दगडी चौथर्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे.

अष्टविनायक गणपती मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत.

स्थान : तालुका बारामती, जिल्हा पुणे, पिन.- ४१२ ३०४

अंतर : पुणे-सासवड-मोरगाव ६४, पुणे-चौफुला-मोरगाव ७७, मुंबई २२५ कि.मी.

जवळची ठिकाणे : जेजुरी-खंडोबाचे देवस्थान,

सासवड : सोपानदेवांची समाधी, पुरातन मंदिरे, आचार्य अत्रे स्मारक

बोपगाव : कानिफनाथाचे मंदिर

नारायणपूर : नारायण महाराज आश्रम व दत्तमंदिर

भुलेश्वर : प्राचीन शिवमंदिर

बेट केडगाव : श्री नारायण महाराज माठ व दत्तमंदिर

२)श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक

सिध्दीविनायक – सिध्दटेक

भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले.

येथील दक्षिणवाहिनी असणाऱ्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो.

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती त्यातील हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभाऱ्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभाऱ्यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.

स्थान : तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

अंतर : अहमदनगर-सिद्धटेक ८२ कि.मी.

पुणे-सिद्धटेक ११४ कि.मी.

जवळची ठिकाणे : किल्ला व भीमेकाठाची प्राचीन मंदिरे

श्रीगोंदा : ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार महान संत शेख महम्मद महाराज यांची समाधी

राशीन : देवाचे मंदिर व झुलती दीपमाळ

रेहेकुरी : अभयारण्य

भिगवण : पक्षी अभयारण्य

दौंड : विठ्ठल व भैरवनाथाचे मंदिर

३)श्री. बल्लाळेश्वर – पाली

बल्लाळेश्वर – पाली

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणाऱ्या  उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभाऱ्याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चवऱ्या ढाळीत आहेत.

स्थान : तालुका सुधागड, जिल्हा रायगड,

अंतर : पाली-खोपोली ३८ कि.मी., पुणे १११ कि.मी., मुंबई १२० कि.मी.

जवळची ठिकाणे : मंदिराजवळ सरसगड किल्ला.

सिद्धेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान (३ कि.मी.)

उन्हेरे : गरम पाण्याचे झरे

उद्धर : रामाने जटायुचा उद्धार केलेले स्थान (१० कि.मी)

रामेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान. येथील अस्थी कुंडात टाकलेल्या अस्थी पाण्यात विरघळतात.

सुधागड : किल्ला.भोराई देवीचे मंदिर.

गोमाशी : भृगुऋषीचे तपश्चर्येचे स्थान (१४ कि.मी.)

ठाणाळे : लेण्या.

उत्तर वरदायिनी : देवीने रामास वर दिला ते ठिकाण (१० कि.मी.)

जांभूळपडा : सिद्धलक्ष्मी मंदिर. दशभुजा व उजव्या सोंडेची जागृत गणेश मूर्ती.

पुई : एकवीस गणेश मंदिर.

पाच्चापूर-भोराई : भोराई किल्ला व देवीचे मंदिर

४)श्री. वरदविनायक – महड

वरदविनायक – महड

ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे.

एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत.

मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

स्थान : तालुका खालापूर, जिल्हा रायगड

अंतर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर खालापूर व खोपोलीदरम्यान हाळ या गावाजवळ.

जवळची ठिकाणे

खंडाळा : थंड हवेचे ठिकाण.

लोणावळा : थंड हवेचे ठिकाण.

कार्ले : लेण्या व एकविरा देवीचे स्थान.

देहू : संतश्रेष्ठ तुकोबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान.

चिंचवड : मोरया गोसावी यांची संजीवन समाधी.

५)श्री. चिंतामणी – थेऊर

चिंतामणी – थेऊर

मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभाऱ्यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली.या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे.

स्थान : तालुका – हवेली, जिल्हा- पुणे,

अंतर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून जवळ.

जवळची ठिकाणे

भुलेश्वर : पुरातन कलात्मक शिवमंदिर.

केडगाव बेट : नारायण महाराज यांचा आश्रम व दत्त मंदिर.

फुलगाव : स्वामी स्वरूपानंद स्थापित भीमे वरील गुरुकुल पद्धतीचा श्रुतीसागर आश्रम व वेदांत रिसर्च सेंटर.

तुळापुर : भीमेकाठी पुरातन संगमेश्वर मंदिर. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक.

६)श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री

गिरीजात्मज – लेण्याद्री

जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्माजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पायऱ्या  आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते.गिरीजात्माजाचे मंदिरअष्टविनायक गणपतीची महत्वाची माहिती . 

स्थान : पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा – पुणे,

अंतर : मुंबई – लेण्याद्री १८० कि.मी.

पुणे-लेण्याद्री १२० कि.मी.,

नाशिक-लेण्याद्री १४० कि.मी., 

अहमदनगर – लेण्याद्री १०० कि.मी.

जवळची ठिकाणे

माळशेज घाट : थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य.

शिवनेरी किल्ला : शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.

कुकडेश्वर : कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर.

नाणेघाट : प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट.

७)श्री. विघ्नेश्वर – ओझर

विघ्नेश्वर – ओझर

सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.

देऊळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

अष्टविनायक गणपती मधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे.

स्थान : तालुका- जुन्नर, जिल्हा पुणे. 

अंतर : पुणे – नाशिक राष्ट्रीय मार्ग क्र. ५० वरील नारायणगावच्या पश्चिमेस.

जवळची ठिकाणे

आळे : पैठण येथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले त्या रेड्याची समाधी.

आर्वी : उपग्रह केंद्र.

खोडद : आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण.

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक स्थान.

८)श्री. महागणपती – रांजणगाव

महागणपती – रांजणगाव

अष्टविनायक गणपती मधील हे शेवटचे आणि जुने मंदिर. हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.

अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे .

स्थान : तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

वढू – भीमा नदीवर श्री संभाजी महाराजांची समाधी, 

तुळापुर : भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांचे संगम स्थान.

फुलगाव : श्रुतीसागर आश्रम.

निघोज : कुकडी नदीच्या पत्रात कुंडच्या आकाराचे नैसर्गिक खळगे.

अश्याप्रकारे अष्टविनायक गणपती ची नावे आणि माहिती येथे समाप्त होत आहे . बरेच यात्री गणपती च्या वेळी ही अष्टविनायक यात्रा करत असतात. तरी देखील तुम्हाला ह्या बाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये आम्हाला लिहून कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *