Purandar | पुरंदर हा किल्ला महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात असून पुणे शहराच्या आग्नेय दिशेस आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सासवड दिवेघाट मार्गे गेल्यास अंदाजे ४८ किलोमीटर तर बोपदेव घाट मार्गे गेल्यास ४० किलोमीटर अंतरावर आहे. तर सासवड या शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे शहरापासून कात्रज घाट, बोपदेव घाट व दिवे घाट हे तिन्ही घाट ओलांडून जाता येते. या किल्ल्याची उंची १५०० मीटर आहे. पुरंदर हा किल्ला विस्ताराने फार मोठा असून या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिबंदी दारूगोळा व धान्याचे साठा करून ठेवला जात असे.
पुरंदर (Purandar) किल्ल्याची एक बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम असून गडावरून आजूबाजूच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येत असे. पुरंदरच्या वायव्य दिशेला सिंहगड तर पश्चिम दिशेला राजगड किल्ला आहे व उत्तरेस मल्हारगड हा किल्ला आहे.
पुरंदरच्या जवळच वज्रगड हा किल्ला आहे. सध्या हे दोन्ही किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात असून सुरक्षेच्या कारणास्तव ज्या किल्ल्यावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच प्रवेश दिला जातो, तर वज्रगड या किल्ल्यावर जाण्यास प्रवेशबंदी आहे.
किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी काही सूचना
१) पुरंदर (Purandar) व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच प्रवेश दिला जातो.
२) किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी आपल्या ओळखीचा पुरावा जवळ ठेवावा उदा: पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटिंग कार्ड इत्यादी.
३) सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरंदर (Purandar) किल्ल्यावरील काही ठिकाने जसे की कंदकडा, केदार दरवाजा, बावची माची ही ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.
४) भैरवखिंड व वज्रगड किल्ल्यावर पूर्णपणे प्रवेश बंदी आहे.
पुरंदर (Purandar) या शब्दाचा अर्थ इंद्र असा होतो ज्याप्रमाणे भगवान इंद्राचे या सृष्टीतील स्थान बलाढ्य तसेच हा पुरंदर सुद्धा बलाढ्य. पुराण ग्रंथात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत असून जेव्हा राम भक्त हनुमान द्रोणागिरी उचलून नेत होते तेव्हा त्या पर्वताचा काही भाग खाली पडला होता. तो हाच इंद्रनील पर्वत असे मानले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर (Purandar) हा किल्ला इसवी सन १६५५ मध्ये जिंकून घेऊन नेताजी पालकर यांना या गडाचे सरनोबत नेमले. १४ मे १६५७ मध्ये याच किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराज यांचा जन्म झाला. १६६५ मध्ये मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग याने या किल्ल्याला वेढा घातला होता. तेव्हा मुघल सरदार दिलेरखान व पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले व यामध्ये मुरारबाजी धारातीर्थी पडले. ही बातमी शिवाजी महाराजांना कळताच महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तहाची बोलणी सुरू केली. व ११ जून १६६५ हा तह ‘पुरंदर तह’ या नावाने पूर्ण झाला. यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यातील २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात देण्याचे मान्य केले होते. या २३ किल्ल्यांमध्ये पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यांचा समावेश होता. १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्याचा सामील करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव आजमगड असे ठेवले. १६९५ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. पेशव्यांच्या काळात जेव्हा जेव्हा पुण्यावर हल्ला होत असे तेव्हा तेव्हा पुरंदर (Purandar) हा एक किल्ला म्हणून काम करत असे. याच किल्ल्यावर १६९७ मध्ये सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला होता. इसवी सन १८१८ पुरंदर व वज्रगड हे दोन्ही किल्ले इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले व या किल्ल्यांचा वापर ते तुरुंग म्हणून करत असत.
पुरंदर (Purandar) किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे
सध्या हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या मुरार गेट या प्रवेशद्वारातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. या ठिकाणी तुम्ही तुमचे ओळखपत्र दाखवून प्रवेश करू शकता.
१) पद्मावती तळे:
मुरार गेटने प्रवेश केल्यानंतर आपल्यास प्रथम पद्मावती तळे पाहण्यास मिळते. या तळ्यात वर्षभर पाणी असते. पद्मावती तळ्यापासून थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला इंग्रजांच्या काळात बांधलेले एक चर्च नजरेस पडते तेथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्यास वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा बघायला मिळेल.
२) बिनी दरवाजा:
पुरंदर (Purandar) हा किल्ला लष्कराच्या ताब्यात देण्या अगोदर किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या दरवाजाचा उपयोग केला जात असे हा दरवाजा किल्ल्याच्या उत्तर बाजूस आहे. सध्या हा दरवाजा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. या दरवाजातून प्रवेश करतात आपल्याला समोरच पुरंदरचा कंदकडा दिसतो. या दरवाजातून दोन मार्ग निघतात उजवीकडे गेल्यास आपल्याला मुरार गेट कडे जाता येते तर डावीकडे पुरंदरेश्वर मंदिर, वज्रगड कडे जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते तेथून थोड्याच अंतरावर पुरंदरेश्वर मंदिर आहे व बाजूलाच एक चौकोनी विहीर असून तिला ‘मसनी विहीर’ असे म्हणतात.
३) पुरंदरेश्वर मंदिर:
हे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून या मंदिराचा जिर्णोद्धार थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केला होता. या मंदिरात इंद्रदेवाचे मूर्ती असून मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशव्यांचे खाजगी रामेश्वर मंदिर आहे.
४) पेशवे वाडा: पुरंदरेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला एका वाड्याचे अवशेष दिसतात बाळाजी विश्वनाथ यांनी हा वाडा बांधला होता असे मानले जाते. या वाड्यातच सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला होता. या वाड्याच्या मागील बाजूस एक विहीर असून ती आजही सुस्थितीत आहे. येथून थोडे पुढे गेल्यानंतर एक वाट किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे तर दुसरी वाट भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण गेल्यास पंधरा मिनिटातच आपण दिल्ली दरवाज्यापाशी पोहोचतो.
५) दिल्ली दरवाजा: हा दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजा व त्याच्या बाजूचे बुरुज आजही सुस्थितीत आहेत. दरवाजावर हनुमानाची मूर्ती आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर तीन वाट्या फुटतात सरळ पुढे चालत गेल्यास एक वाट केदार दरवाजा व केदारेश्वर मंदिराकडे जाते तर उजवीकडची वाट राजगादी कडून शेंदऱ्या बुरुजापर्यंत जाते तर डावीकडची वाट कंद कड्याकडे जाते ही वाट भारतीय लष्कराने तारेचे कुंपण घालून बंद केली आहे.
६) केदारेश्वर मंदिर:
केदारेश्वर मंदिर सर्वात उंच भाग असून हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून हजारो भाविक महाशिवरात्रीला या ठिकाणी भेट देतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे या ठिकाणावरून आजूबाजूचे गड किल्ले जसे की राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, मल्हारगड व रोहिडा हे किल्ले आधी सहजपणे दिसून येतात.
पुरंदर (Purandar) किल्ल्यावर राहण्याची सोय
पुरंदर (Purandar) हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असून येथे लष्कराच्या चौक्या आहेत त्यामुळे येथे रात्री राहण्याची परवानगी दिली जात नाही परंतु पायथ्याशी असलेल्या नारायणपूर या गावात राहण्याची सोय होऊ शकते.
पुरंदर (Purandar) किल्ल्यावर जेवणाची पिण्याच्या पाण्याची सोय
किल्ल्यावर पुरंदरेश्वर मंदिराच्या जवळच एक छोटेसे कॅन्टीन असून यामध्ये चहा नाश्त्याची सोय आहे परंतु आपण स्वतः आपल्या जेवणाची व्यवस्था करावी. किल्ल्यावर बारा माही पिण्याचे पाणी जरी उपलब्ध असले तरी पिण्याचे पाणी मात्र नेहमी आपल्या सोबत ठेवावे किल्ल्याचा उंचीवरील भाग केदारेश्वर मंदिर येथे पाण्याची सोय नाही.
पुरंदर (Purandar) किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
हा किल्ला पूर्णपणे बघण्यासाठी ३-४ पाच लागतात. पावसाळ्याच्या काळात या किल्ल्यावर विविध जातीचे रानफुले आढळून येतात. महाराष्ट्रातील कास पठारनंतर दुसरे सर्वाधिक रानफुलांचे विविध आढळणारे पुरंदर हे ठिकाण आहे. त्यामुळे या किल्ल्याला आवश्य भेट द्यावी या किल्ल्याला भेट देण्यासाठी सप्टेंबर हा सर्वाधिक योग्य काळ होय.