llपुण्यातील मानाचे ५ गणपती ll
१) कसबा गणपती (मानाचा पहिला)
कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली.हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई भोसले यांनी १६३९ साली बांधले होते.हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.
या गणपतीला ’जयति गणपति’ असेही म्हणतात कारण प्रत्येक स्वारीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या गणपतीचे दर्शन घेत असत.या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.
२)तांबडी जोगेश्वरी (मानाचा दूसरा गणपती)
पुण्यातील मानाचे ५ गणपती त्यातील दुसऱ्या स्थानी असलेले हे तांबडी जोगेश्वरी (मानाचा दूसरा गणपती) आहे.
१८८३ साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. कसबा गणपती हा पुण्याचा “ग्रामदैवत” म्हणून ओळखला जातो तसेच तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची “ग्रामदेवता” मानली जाते. तिच्या परिसरातील ही गणेश असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते
येथे वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
३)गुरुजी तालीम (मानाचा तिसरा गणपती)
पुण्यातील मानाचे ५ गणपती त्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीची १८८७ साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता ती तालीम अस्तित्वात नाही.
४) तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा)
श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती असून या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली.१९७५ मध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.
५)केसरीवाडा गणपती (मानाचा पाचवा)
पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे. या गणपतीच्या मूर्तीची पहिल्यांदा स्थापना हि लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये विंचरूकर वाडा मध्ये केली होती.
त्यानंतर १९०५ पासून केसरीवाड्यात हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याकाळापासून चालत आलेली गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा सुरु असून इतक्या वर्षानंतर देखील त्यामध्ये कोणताही खंड पडलेला नाही.